मूळ सदोष आहारपध्दतीत पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नारायण यांचे मत; किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचा समारोप
‘गेल्या काही वर्षांत प्राण्यांपासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. हे आजार म्हणजे आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याचे संकेत आहेत. कोरोनासारख्या सूक्ष्म विषाणुने तर संपूर्ण जगाला गुडघे टेकायला भाग पाडले. हा प्राण्यांच्या अधिवासावर मनुष्यजातीने आक्रमण केल्याचा परिणाम आहेच. तसेच याचे मूळ आपल्या सदोष आहारपध्दतीत आहे,’’ असे मत पर्यावरण तज्ज्ञ आणि शाश्वत विकासाच्या पुरस्कर्त्या सुनीता नारायण यांनी व्यक्त केले. पंधराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ऑनलाइन समारोप सत्रात त्या बोलत होत्या. सुनीता नारायण म्हणाल्या, ‘‘वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी अन्न उत्पादन वाढवण्याची आवश्यकता आहेच. मात्र पोषण व सुदृढ आरोग्यासाठी आणि मुख्यत्वे पर्यावरणासाठी चांगले अन्न कोणते, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. त्यासाठी ‘फास्ट फूड’कडून ‘फर्स्ट फूड’कडे वळावे लागेल. ‘फर्स्ट फूड’मध्ये आपल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीतील पारंपारिक अन्नपदार्थांचा समावेश होतो. तसेच पाण्यात, शेतीत, जमिनीत गुंतवणूक करावी लागेल. लहान शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल आणि उत्पादकाला थेट पैसे मिळतील, याची खात्री द्यावी लागेल. आपण आताच खबरदारी घेतली नाही, तर भावी पिढीचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल.’’ आंतरराष्ट्रीय बडिंग आणि रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. रुवेन योसफ यांना महोत्सवातील सर्वोच्च ‘वसुंधरा सन्मान’ देऊन गौरवण्यात आले. मूळचे पुण्याचे असलेल्या प्रा. योसफ यांना ‘व्हिजनरी ऑफ इस्त्रायल कन्झरव्हेशन अॅवार्ड’ या सर्वोच्च पदवीने इस्त्रायलचे पंतप्रधान शिमन पेरेज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. मध्यपूर्व भूमध्य प्रदेशावर स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना विश्रांतीसाठी सुयोग्य स्थानाची निर्मिती त्यांनी केली. या कार्यासाठी त्यांना यंदाचा ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला. या वेळी ‘पर्यावरण स्नेही घर’ ही संकल्पना रुजवणाऱ्या प्रतीक धानमेर यांच्याशी महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी संवाद साधला. भारतातील नैसर्गिक बहु विविधतेमुळे गावागावांतील खाद्य संस्कृतीत तफावत दिसून येते. परंतु, ही तफावतच मानवी आरोग्यासाठी पोषक आहे. या वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे जतन होणे गरजेचे आहे. -सुनीता नारायण, पर्यावरण तज्ज्ञ
